कोण गाठणार दिल्‍ली? चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत वाढली चुरस; वाढत्या तापमानामुळे उमेदवारांची दमछाक

Foto
औरंगाबाद: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण २३ उमेदवार रिंगणात असले तरी शिवसेना-भाजप युतीचे खा.चंद्रकांत खैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे सुभाष झांबड, एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे आ. इम्तियाज जलील व शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे संस्थापक आ.हर्षवर्धन जाधव यांच्यात खरा सामना होणार आहे. पाचव्यांदा खासदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगून खैरे यांनी प्रचाराला जोर दिला असला तरी यावेळी त्यांच्यासमोर झांबड, जलील व जाधव या तिन्ही आमदारांनी कडवे आव्हान उभे केल्याचे दिसत आहे. या चौरंगी लढतीत कोणता उमेदवार विजयी होऊन दिल्‍ली गाठणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

या मतदारसंघात येत्या २३ एप्रिलला मतदान होणार असून, मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसा प्रचार जोर धरत आहे. तापमानाचा पारा ४० अंशांवर जाऊन पोहोचला आहे. हाच वाढता पारा उमेदवारांसाठी तापदायक बनला आहे. रखरखत्या उन्हात सर्व उमेदवार घामाघूम होऊन प्रचारात आघाडी मिळवण्यासाठी पायपीट करताना दिसत आहेत. खा.खैरे, आ. झांबड, आ. जाधव यांनी सध्या ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसने आ.सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व सिल्‍लोडचे आ.अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता;परंतु नंतर अर्ज परत घेतला. आता आ.सत्तार व रामकृष्णबाबा पाटील यांनी झांबड यांच्या विरोधात भूमिका घेत अपक्ष उमेदवार आ.हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र दर्डा व त्यांचे समर्थक औरंगाबाद पूर्व मतदारसंघात झांबड यांचा प्रचार करत आहेत. औरंगाबादमधून लोकसभेसाठी इच्छुक असलेले व नंतर ही जागा काँग्रेसला सुटल्याने नाराज झालेले राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण सध्या उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजीतसिंह यांच्या प्रचारात असून, ते अद्याप आ.झांबड यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादीचे वैजापूरचे आ.भाऊसाहेब पा. चिकटगावकर, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, कार्याध्यक्ष अभय पा. चिकटगावकर, कदीर मौलाना आदी मोजके नेते आ.झांबड यांचा प्रचार करत आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खरेच आ.झांबड यांना मदत करतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खैरे, झांबड, जाधव व जलील यांनी जिल्ह्यात जाहीर सभा, बैठका, पोस्टर, बॅनरसह सोशल मीडियातून एकमेकांची उणी-दुणी काढत जोरदार प्रचार सुरू केला आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ५८ हजार २६२ मतदार असून, यामध्ये ८ लाख ९२ हजार २१७ महिला मतदार आहेत. यंदा या मतदारसंघात १ लाख ७७ हजार ३३४ महिला मतदारांची वाढ झाली असून, या निवडणुकीत नारीशक्‍तीचे हे मतदान निर्णायक ठरणार आहे. सर्वच उमेदवारांचे लक्ष महिला व तरुणांच्या व्होट बँकेकडे आहे. मराठा, मुस्लिम व दलित मते यावेळी निर्णायक ठरणार आहेत. मतदारसंघात ७ लाखाच्या वर मुस्लिम व मागासवर्गीय मतदान आहे. यावेळी मुस्लिम व दलित मतांमध्ये फाटाफूट अटळ असून, खैरे, झांबड व जाधव यांच्यात हिंदू मतांची विभागणी होईल, असे दिसते. जुने शिवसैनिक सुभाष पाटील हे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाकडून उभे असून, ते कोणाची मते खातात, याबाबतही उत्सुकता आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आ. हर्षवर्धन जाधव यांनी खा.खैरे यांच्याशी मतभेद झाल्याने शिवसेना सोडून शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन केला. मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देणारे जाधव हे खैरेंचा पराभव करण्यासाठी मैदानात उतरले असून, त्यांना भाजप व राष्ट्रवादीच्या एका गटाने छुपा पाठिंबा दिल्यामुळे खैरेंना फटका बसण्याची शक्यता आहे.  वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे महामंडलेश्‍वर शांतीगिरी महाराज भक्‍त परिवाराने व मराठा क्रांती मोर्चाच्या काही पदाधिकार्‍यांनी आ. जाधव यांना पाठिंबा दिल्याने खैरेंची डोकेदुखी वाढली आहे.

शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचे प्रयत्न
मागील प्रत्येक निवडणुकीत दिलेले आश्‍वासन, शहरातील खड्डे, कचरा आणि पाणी समस्या, एमआयडीसीमध्ये अपुर्‍या सुविधा, रोजगार आदी अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या वीस वर्षांत खैरेंनी मतदारसंघात विकासाची कोणती भरीव कामे केली, असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. सर्वसामान्य मतदारांमध्ये खैरेंविषयी मोठा रोष आहे. मागील काही दिवसांपासून भाजप-शिवसेनेत तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आ.अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आदी मोजके नेते वगळता भाजपचे इतर स्थानिक पदाधिकारी जालना व बीड मतदारसंघात प्रचाराला गेले आहेत. त्यामुळे खैरेंच्या प्रचारात भाजप कार्यकर्ते फारसे दिसत नाहीत. अशातच शिवसेनेतील नाराज गट यावेळी खरेच खैरेंना मदत करणार का? दरवेळी मताधिक्य देणार्‍या वैजापूर, कन्‍नड, गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून यावेळी खैरेंना लीड मिळणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरवेळी शेवटच्या टप्प्यात हिंदुत्वाचा गजर करत खैरे हे मतदारांना आपल्या बाजूने वळवत असतात. निवडणुकीच्या तोंडावर नाडी-पुडीबाबत वादाचा विषय बनलेले खैरे यांना यावेळी हिंदुत्व, धार्मिक राजकारण तारणार का? शिवसेनेचा गड ते अबाधित ठेवणार का? हे येणार्‍या काळात मतदारच ठरवतील.